पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ
पोहरादेवी | दि. २० सप्टेंबर बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाने रविवारी नाट्यमय वळण घेतले. सकाळी रमेश पवार, सुरेश राठोड आणि सतीश पवार यांनी डॉ. रामरावबापू महाराज यांच्या मंदिरावर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज, शेखर महाराज,संजय महाराज, भक्तराज महाराज,रमेश महाराज यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केल्यानंतर तब्बल एका तासाने आंदोलक मंदिरावरून खाली उतरले.
यानंतर शासनाच्या वतीने नायब तहसीलदार उमेश बनसोड यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या दि. २० सप्टेंबरच्या पत्राचे वाचन केले. बंजारा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने गठीत केलेल्या समितीला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत उर्वरित सुनावणी, कागदपत्रांची छाननी, संबंधितांकडून माहिती संकलन आणि आवश्यक अभ्यास पूर्ण करून अंतिम अहवाल शासनाला सादर करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
शासनाच्या या भूमिकेनंतर धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज आणि नायब तहसीलदार उमेश बनसोड यांच्या हस्ते आंदोलकांना लिंबूपाणी देण्यात आले आणि उपोषणाची तूर्त सांगता करण्यात आली. उपोषण मागे घेण्यात आले असले तरी समाजाच्या मागण्यांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे निकाली निघालेला नाही, हे या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पुढील पंधरा दिवसांत जिंतूर येथील विनोद आडे तसेच पोहरादेवी येथील आठ आंदोलकांची मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बाबुसिंग महाराज यांनी सांगितले. आंदोलनाच्या काळात मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच पुढील आंदोलनाची दिशा याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
“मागण्या मान्य होत नसल्याचे स्पष्ट झाल्यास आंदोलकांसोबत दिल्ली येथे जाऊन उपोषण करू,” असा इशाराही बाबुसिंग महाराज यांनी दिला.
उपोषणाची सांगता झाल्यानंतर रमेश पवार, अंकुश श्रीराम राठोड, दिनकर सुदाम राठोड, सतीश श्यामराव पवार, श्रीकांत मदन राठोड, सुरेश नामदेव राठोड सर्व आंदोलकांना वैद्यकीय तपासणीसाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.जयसिंग राठोड हे ग्रामीण रुग्णालय येथे दोन दिवसा पासून उपचारासाठी दाखल आहे.यावेळी महंत सुनील महाराज,जितेंद्र महाराज ,यशवंत महाराज,रविकांत राठोड,नागपूरचे आत्माराम चव्हाण,अकोला येथील लता राठोड उपस्थित होते. यावेळी ठानेदार नैना पोहेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आता ३१ डिसेंबरपर्यंत समितीच्या अहवालाकडे समाजाचे लक्ष लागले असून, शासन या अहवालावर कोणती भूमिका घेते, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी
24 Sep 2026
प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .
20 Sep 2026
पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
16 Sep 2026
एसीएपी’ प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ द्यावा; तांडा सुधार समितीची मागणी
10 Sep 2026