Site Logo
विदर्भ

पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

प्रकाशित: 16 Sep 2026, 04:56 PM
114 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी | दि. १६ सप्टेंबर शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मानोरा येथे भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पीकविमा, कर्जमाफी आणि शेतमालाला रास्त हमीभाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी दुपारी एक वाजता पंचायत समिती कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली.

मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी आमदार अनंतकुमार पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देत मोर्चा दिग्रस चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून आंदोलन

दरम्यान, मोर्चादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे आणि CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या प्रतिमांवर दूध अर्पण करून दुग्धाभिषेक केला. त्यानंतर प्रतिमांवर दूध टाकून त्या धुण्यात आल्या. या कृतीतून संबंधित विषयाकडे शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.

यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील, अनिल राठोड, राजू चौधरी, अरविंद पाटील, डॉ. संजय रोठे, रवी पवार आणि डॉ. विठ्ठल घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. पीकविमा, कर्जमाफी आणि शेतमालाच्या भावासह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चात एक हजारांहून अधिक शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मानोरा परिसरातील शेतकरी प्रश्नांबाबतचा असंतोष ठळकपणे दिसून आला.

भाषणे संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा शांततेत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

यावेळी महंत रमेश महाराज,कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ईफतेखार पटेल,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामनाथ राठोड, बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, बाबुसिंग नाईक अनिल डेरे, संचालक सुनील जामदार,माजी नगर अध्यक्षा बरखा बेग,रामदास भोरकडे, वीरू राठोड, मखराम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या

वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

24 Sep 2026

प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .

20 Sep 2026

पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ

20 Sep 2026

एसीएपी’ प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ द्यावा; तांडा सुधार समितीची मागणी

10 Sep 2026

मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा तीव्र आंदोलन! १६ सप्टेंबरला महाविकास आघाडीचा धडक मोर्चा

09 Sep 2026