मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा तीव्र आंदोलन! १६ सप्टेंबरला महाविकास आघाडीचा धडक मोर्चा
मानोरा:तालुक्यात गेल्या पंचवीस दिवसांपासून पावसाने संपूर्णपणे दांडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा कमालीचा घटला आहे. पाऊस नसल्याने उभी पिके डोळ्यादेखत करपू लागली असून, तालुक्यातील तब्बल ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. या भयंकर परिस्थितीमुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला असून तालुक्यात दुष्काळाची भीषण सावली पसरली आहे.राज्यातील इतर अनेक जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी मानोरा तालुक्याला मात्र अद्यापही दुष्काळग्रस्त घोषणेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, १६ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मानोरा येथे एका भव्य आणि आक्रमक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
## लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून पाहणी, मात्र घोषणा शून्य!
दुष्काळाची दाहकता पाहता नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी शेंदुरजना येथील शेतांमध्ये जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच इंजोरी शिवारात आमदार सई डहाके यांनीही प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व पिकांच्या दुरवस्थेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. प्रशासकीय प्रमुख आणि लोकप्रतिनिधींनी पिकांची विदारक स्थिती डोळ्यांनी पाहिली असतानाही, सरकारकडून मानोरा तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर का केले जात नाही? असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.
## महाविकास आघाडी आक्रमक; अनिल राठोड आणि अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वात धडकणार मोर्चा
सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा आणि संथ कारभाराचा तीव्र निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड आणि माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या धडाकेबाज नेतृत्वात १६ सप्टेंबर रोजी हा विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चाच्या मुख्य मागण्या:मानोरा तालुका त्वरित 'दुष्काळग्रस्त' घोषित करावा.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट भरघोस आर्थिक मदत द्यावी.शेतकरी विम्याची रक्कम तात्काळ मंजूर करावी.अनेक शेतकऱ्याचे नाव कर्ज माफीत आले नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी. कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्सान रक्कम तात्काळ जमा करावी.
शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि आता सरकार त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. जर १६ सप्टेंबरच्या मोर्चापूर्वी सरकारने मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला नाही, तर हा मोर्चा प्रशासनाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीचे नेते बँकेचे संचालक अरविंद पाटील इंगोले यांनी दिला आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे आता प्रशासनाची चांगलीच धावपळ उडण्याची शक्यता आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी
24 Sep 2026
प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .
20 Sep 2026
पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ
20 Sep 2026
पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
16 Sep 2026