Site Logo
उत्सव

दुष्काळाच्या सावटातही मानोरात पोळ्याचा उत्साह बैलजोडी पूजनासह घाट वितरण; ‘गण’च्या सादरीकरणाने वेधले नागरिकांचे लक्ष

प्रकाशित: 10 Sep 2026, 02:50 PM
171 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी :शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाला असलेले अनन्यसाधारण महत्त्व आणि वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण मानोरा शहरात दुष्काळाच्या छायेतही उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस स्टेशनसमोरील मैदानावर आयोजित पोळा उत्सवाला शेतकरी, व्यापारी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलजोडीला सजवून पोळा सणाची परंपरा जपली. त्यामुळे यंदाच्या पोळ्याला उत्साहासोबतच दुष्काळाची वेदनाही जाणवत होती.

पोळा सणानिमित्त बैलजोडी पूजनाचा मान गोपाल लठा यांनी पार पाडला. यावेळी त्यांनी विधिवत बैलाचे पूजन केले. संजय गिरी यांनी बैलाचे पूजन करून घाट वितरणाचा मान पार पाडला. तसेच जगदीश जोशी आणि डॉ. संजय रोठे यांनीही बैलाचे पूजन केले.

दरम्यान, जगदीश जोशी यांनी पोळ्यानिमित्त ‘गण’ सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवामुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोळा पाहण्यासाठी मानोरा शहरासह जुन्या वस्तीतील शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सजविलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

मात्र, यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट स्पष्टपणे जाणवत होते. पावसाअभावी पिके करपली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा संकटाच्या काळातही शेतकऱ्यांनी बैलाप्रती असलेली कृतज्ञता आणि पारंपरिक संस्कृतीची नाळ कायम ठेवत पोळा सण साजरा केला.


Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: