भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप; मानोऱ्यात दहा गणेश मंडळांचे शांततेत विसर्जन
मानोरा प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर
मानोरा शहरात गणेशोत्सवाची सांगता शनिवारी भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात झाली. शहरातील ११ गणेश मंडळांपैकी एका मंडळाने २५ सप्टेंबर रोजी गणेशमूर्तीचे विसर्जन केले, तर उर्वरित दहा गणेश मंडळांनी शनिवारी सायंकाळी भव्य विसर्जन मिरवणूक काढत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
शहरातील गणेश मंडळांनी १४ सप्टेंबर रोजी विधिवत पूजन करून गणरायाची स्थापना केली होती. दहा दिवसांच्या उत्साहपूर्ण गणेशोत्सवानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता विविध मंडळांच्या आरतीनंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशे आणि डीजेच्या तालावर तरुणांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनेकांनी नृत्य सादर करत आनंद व्यक्त केला.
मिरवणुकीतील सर्व गणेश मंडळे रात्री आठच्या सुमारास दिग्रस चौकात एकत्र आली. गणरायाच्या दर्शनासाठी तसेच विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दिग्रस चौकात नागरिक व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे परिसराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
मंडळ प्रमुखांचा पोलिसांकडून सन्मान
यावेळी मानोरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार नैना पोहेकर यांनी शहरातील दहा गणेश मंडळांच्या प्रमुखांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मंडळ प्रमुखांचा अशा पद्धतीने सन्मान करण्याचा हा पोलिसांकडून पहिलाच उपक्रम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक झाले.
सन्मानानंतर विसर्जन मिरवणूक पोलीस स्टेशन मार्गे गणेश घाटाकडे रवाना झाली. गणेश घाटावर पोहोचल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर *‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’*च्या जयघोषात गणेशमूर्तींचे अरुणावती नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.
पोलिसांकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश
गणेश विसर्जनाच्या निमित्ताने मानोरा पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार, गावातील नागरिक तसेच बंदोबस्तासाठी बाहेरून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रसादरूपी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. उत्सवाच्या निमित्ताने पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.
दरम्यान, संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. धार्मिक उत्साह, नागरिकांचा सहभाग आणि पोलिसांचे नियोजन यामुळे मानोरा शहरातील गणेश विसर्जन सोहळ्याला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
नगरपंचायतीचा पर्यावरणपूरक उपक्रम; तीन फुटांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम टाकीत विसर्जन
25 Sep 2026
गणरायाच्या आगमनाने मानोरा भक्तिमय!
13 Sep 2026
दुष्काळाच्या सावटातही मानोरात पोळ्याचा उत्साह बैलजोडी पूजनासह घाट वितरण; ‘गण’च्या सादरीकरणाने वेधले नागरिकांचे लक्ष
10 Sep 2026
मानोरा तालुक्यात पोळ्याचा उत्साह; तीन गावांनी पोलिस बंदोबस्त नाकारला! कारखेडा, आसोला व देऊरवाडीचा निर्णय; ठाणेदार नैना पोहेकर यांची माहिती
10 Sep 2026