Site Logo
विदर्भ

बारावीत गावातून प्रथम आलेल्या गोपिका राठोडला ग्रामपंचायतीने दिला अनोखा बहुमान; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

प्रकाशित: 28 Aug 2026, 09:00 AM
123 Views
Featured News Image

मानोरा : ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या संकल्पनेची प्रत्यक्ष अनुभूती मानोरा तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीने विद्यार्थिनीला करून दिली. बारावीच्या परीक्षेत गावातून प्रथम आलेल्या कु. गोपिका विजय राठोड हिला ग्रामपंचायतीच्या वतीने ‘एक दिवसाची सरपंच’ होण्याचा बहुमान देण्यात आला. विद्यार्थिनीला केवळ सत्काराची थाप न देता गावाचा कारभार, नेतृत्व आणि जबाबदारीची प्रत्यक्ष जाणीव करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. २० रोजी श्री शंकरगिरी महाराज सभागृहात आयोजित ‘एक दिवसीय सरपंच व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात’ गोपिका राठोडचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी तिच्या आई-वडिलांचाही ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव करण्यात आला.

‘गुणांच्या पलीकडे नेतृत्वाची संधी’


गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती राजपुरोहित यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासोबतच विद्यार्थिनीला एक दिवस सरपंच होण्याची संधी देणे ही अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय संकल्पना आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होते. कारखेड्याचा हा उपक्रम राज्यभर राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुणवंतांचा सन्मान; पालकांचाही गौरव

दहावीमध्ये गावातून प्रथम आलेल्या कु. प्रिया सुनील गावंडे, नेपाळ येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा प्रणव श्रीकृष्ण पाटील, शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेला मंथन विजय काजळे तसेच वरोली येथील कु. सोनल सुनील मालटे हिने NEET परीक्षेत ५५८ गुण मिळविल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांनी गावातील रस्ते, गटार व्यवस्था, स्मशानभूमी व अन्नछत्राची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली.

ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे कारखेड्यातील विद्यार्थ्यांमध्ये ‘आम्हीही काहीतरी मोठे करू शकतो’ असा आत्मविश्वास निर्माण झाला असून, शिक्षणासोबत नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीची नवी प्रेरणा मिळाली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित होत्या. प्रमुख अतिथी पंचायत विस्तार अधिकारी देवाभाऊ राठोड होते. सरपंच प्रशासक सोनाली बबन देशमुख, उपसरपंच अनिल काजळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, ग्राम संघाच्या महिला पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी केले. प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले, तर समीर देशमुख यांनी आभार मानले.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या

वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

24 Sep 2026

प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .

20 Sep 2026

पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ

20 Sep 2026

पीकविमा, कर्जमाफी अन् शेतमालाला रास्त हमीभावासाठी मानोऱ्यात भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

16 Sep 2026

एसीएपी’ प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा स्पॉट राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ द्यावा; तांडा सुधार समितीची मागणी

10 Sep 2026