Site Logo
वाशिम जिल्हा

मानोरा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; २३८ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी तातडीने करा

प्रकाशित: 20 Sep 2026, 02:45 PM
102 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी | दि. २० सप्टेंबर  तालुक्यात गेल्या ५० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी पाणी व चारा संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य विजय अनंतकुमार पाटील यांनी केली.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे हॉलमध्ये त्यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन दोन स्वतंत्र निवेदने सादर केली.

पावसाअभावी सोयाबीनचे पीक जागेवरच करपून शेंगा वाळल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हेक्टरी ५० हजार रुपये मदत, शेतमजूर कुटुंबांना अर्थसाहाय्य, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार भत्ता तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

दरम्यान, रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीपासून वंचित राहिलेल्या २३८ पात्र शेतकऱ्यांची लॉट एन्ट्री तातडीने करून खरेदी सुरू करावी, अशी दुसरी प्रमुख मागणी करण्यात आली. खरेदीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवूनही संबंधित शेतकऱ्यांची प्रक्रिया प्रलंबित असल्याने त्यांचे नुकसान होत असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

या मागण्यांवर पालकमंत्री भरणे यांनी सकारात्मक विचार करून प्रशासनाला आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: