विदर्भ–मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी खासदार संजय देशमुख यांची रेल्वे बोर्डाकडे जोरदार मागणी
मानोरा : विदर्भ व मराठवाडा भागातील रेल्वे विकासाला गती देण्यासाठी खासदार संजय देशमुख यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्यासमवेत भेट घेऊन विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्प आणि नवीन रेल्वे सेवांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. या मागण्यांवर सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे बोर्ड अध्यक्षांनी दिले.
खासदार संजय देशमुख यांनी विदर्भ व मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अद्यापही अपुरी असल्याचे नमूद करत औद्योगिक, शैक्षणिक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने रेल्वे सुविधांचा विस्तार अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अकोला मार्गे सुरू करून वाशीम व अकोला येथे अधिकृत थांबा देण्याची प्रमुख मागणी केली.
तसेच नांदेड–छत्रपती संभाजीनगर/मनमाड मार्गे वाशीम–अकोला दररोज इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे, जनशताब्दी एक्सप्रेस (12071/12072) हिंगोलीहून वाशीमपर्यंत विस्तारित करणे, वर्धा–नांदेड रेल्वे मार्गाचे काम गतीने पूर्ण करणे, मूर्तिजापूर–दारव्हा (यवतमाळ) रेल्वे मार्गाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देऊन मंजुरी देणे, वाशीम–बडनेरा रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून प्रकल्प मंजूर करणे तसेच वाशीम–दिग्रस–माहूर–आदिलाबाद या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय नांदेड–कुर्ला (17665/66 व 17667/68) रेल्वे सेवा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करत या गाडीच्या वेळापत्रकात प्रवाशांच्या सोयीने बदल करावेत व कायमस्वरूपी रॅक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. नागपूर–कोल्हापूर (11403/04) ही रेल्वे सध्या आठवड्यातून दोन दिवस धावते, ती दररोज सुरू करावी, तसेच नांदेड–नागपूर दरम्यान दैनिक पॅसेंजर रेल्वे आणि नांदेड–पुणे (वाशीम–अकोला मार्गे) नवीन दैनिक रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही खासदार देशमुख यांनी केली.
या सर्व मागण्यांची पूर्तता झाल्यास विदर्भ व मराठवाड्यातील लाखो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच या भागातील औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केला.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सादर करण्यात आलेल्या सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
नॉन-क्रीमीलेअरचा प्रश्न?रोखठोक लेखमाला – भाग ५
29 Sep 2026
वसंतराव नाईकांच्या नावाचे महामंडळ; निधीची आकडेवारी समोर, तरी लाभार्थ्यांच्या हातात पैसा कधी?रोखठोक भाग ४
28 Sep 2026
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कधी? रोखठोक भाग ३
27 Sep 2026
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा लढा : आता समितीपलीकडे निर्णयाची वेळ! रोखठोक | भाग – २
26 Sep 2026