बंजारा एसटी आरक्षणाचा अहवाल जाहीर करा; पोहरादेवीत आमरण उपोषण तीव्र ,पाचव्या दिवसापासून वैद्यकीय सेवा व पाणी नाकारण्याचा आंदोलकांचा इशारा
मानोरा प्रतिनिधी | दि. १६ सप्टेंबर
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आठ आंदोलकांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज चौथा दिवस पूर्ण झाला. शासनाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असली, तरी या समितीच्या कामकाजाची सद्यस्थिती आणि प्रगती अहवाल समाजासमोर जाहीर का केला जात नाही? असा थेट सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
उपोषणकर्ते रमेश उर्फ सोनू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचव्या दिवसापासून वैद्यकीय सेवा आणि पाणी नाकारण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, बीड येथील सतीश पवार यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत असूनही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर आंदोलकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
#₹१५० हून अधिक महिलांची भेट; ७१ वर्षीय आंदोलकाच्या प्रकृतीची चिंता
दरम्यान, राज्यभरातील रणरागिणी महिला मंडळाच्या १५० हून अधिक महिलांनी उपोषण मंडपाला भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी ७१ वर्षीय जयसिंग राठोड यांच्या प्रकृतीबाबत महिलांनी चिंता व्यक्त केली. भावनिक वातावरणात काही महिलांना अश्रू अनावर झाले.
##प्रशासनाचे आवाहन; आंदोलक मात्र मागणीवर ठाम
तहसीलदार राजेंद्र पाटील आणि ठाणेदार नैना पोहेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. आरोग्याच्या सुविधा नाकारून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये आणि सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तहसीलदार पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन शासन स्तरावर पाठविण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, मागणीवर ठोस निर्णय आणि समितीच्या कामकाजाबाबत स्पष्टता मिळेपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
आठ आंदोलक कोण?
# या आंदोलनात श्रीकांत राठोड (जालना), सतीश पवार (बीड), अंकुश राठोड (मेहकर), दिनकर राठोड (पुसद), सुरेश नामदेवराव राठोड (हिंगोली), रमेश उर्फ सोनू पवार (उमरी), नामदेव तुकाराम राठोड (औंढा) आणि जयसिंग रामवत (आर्णी) हे आठ आंदोलक सहभागी आहेत.
आता समितीच्या कामकाजाचा प्रगती अहवाल शासन कधी जाहीर करणार आणि आंदोलनकर्त्यांशी पुढील चर्चा कोणत्या पातळीवर होणार, याकडे बंजारा समाजाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आंदोलकांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही महत्त्वाचा ठरला आहे.