Site Logo
संपादकीय

गणपती बाप्पा मोरया... पण उत्सवाचा अर्थ तरी समजून घ्या! संपादकीय

प्रकाशित: 15 Sep 2026, 04:16 AM
103 Views
Featured News Image

“गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया!”

हा जयघोष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमू लागला की वातावरण भक्तिमय होते. घराघरांत गणरायाची स्थापना होते, सार्वजनिक मंडळे सजतात, आरतीचे सूर ऐकू येतात आणि दहा दिवसांचा उत्सव सुरू होतो. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

मात्र आज एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे—आपण गणपतीचा उत्सव साजरा करतोय की उत्सवाच्या नावाखाली आपलीच संस्कृती विसरत चाललो आहोत?

टिळकांनी गणेशोत्सवाला दिला होता सामाजिक जागृतीचा चेहरा

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले, त्यामागे केवळ धार्मिक भावना नव्हती. त्या काळात समाजाला एकत्र आणणे, लोकांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणे आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला जनाधार मिळवून देणे, हा त्यामागचा मोठा सामाजिक उद्देश होता.

गणपतीच्या मंडपात लोक एकत्र यायचे, विचारांची देवाणघेवाण व्हायची, व्याख्याने व्हायची, सामाजिक प्रबोधन व्हायचे. म्हणजेच गणेशोत्सव हा समाजाला जागे करणारा उत्सव होता.

आज शंभराहून अधिक वर्षांनंतर आपण त्या उत्सवाचे स्वरूप नेमके कुठे आणून ठेवले आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

काही मंडळांचे कार्य कौतुकास्पद

आजही अनेक गणेश मंडळे अत्यंत चांगले काम करीत आहेत, हे नाकारता येणार नाही. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना मदत, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक साहित्य वाटप, पूर-दुष्काळग्रस्तांना मदत अशा विविध उपक्रमांमधून अनेक मंडळे समाजापुढे आदर्श निर्माण करीत आहेत.

अशा मंडळांना सलामच केला पाहिजे.

कारण गणपतीच्या चरणी ठेवलेला पैसा जर एखाद्या गरजूच्या उपयोगी पडला, तर त्या पैशाचे खरे पावित्र्य जपले जाते.पण दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे.

वर्गणीच्या नावाखाली दादागिरी कशासाठी?

गणेशोत्सव आला की अनेक ठिकाणी सार्वजनिक वर्गणी सुरू होते. वर्गणी देणे ही श्रद्धेची बाब आहे; परंतु वर्गणीच्या नावाखाली दबाव, आग्रह किंवा दादागिरी केली जात असेल तर त्याला उत्सव कसे म्हणायचे?

काही ठिकाणी राजकीय मंडळींच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा केली जाते. त्यातून भव्य मंडप, मोठे स्पीकर आणि प्रचंड आवाजाचे डीजे लावले जातात. प्रश्न असा आहे—गणपती बाप्पाला खरोखर एवढा मोठा आवाज हवा आहे का?

देवाच्या नावाने पैसा गोळा करून तो पैसा समाजाच्या उपयोगी न आणता केवळ दिखावा आणि ध्वनिप्रदूषणासाठी खर्च करणे, ही गणरायाची सेवा आहे की स्वतःच्या प्रतिष्ठेची स्पर्धा?                                                                                                        डीजेच्या तालावर भक्ती की बेभानपणा?

डीजे असू नये असे नाही. उत्सवात आनंद असायलाच हवा. पण आनंद आणि उन्माद यामध्ये फरक आहे.

काही ठिकाणी डीजेच्या प्रचंड आवाजावर तरुणाई बेभान होऊन नाचताना दिसते. त्यात दारूचा अंमल मिसळला की उत्सवाचे रूपच बदलते. गणपतीच्या नावाने दारू पिऊन धिंगाणा घालणे, शिवीगाळ करणे, महिलांना त्रास होईल असे वर्तन करणे आणि रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण करणे—याला भक्ती म्हणायची तरी कशी?

गणरायाच्या मूर्तीसमोर हात जोडून आरती करायची आणि काही तासांनी त्याच गणरायाच्या नावावर दारू पिऊन धिंगाणा घालायचा, हा विरोधाभास समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

गणपतीजवळ पत्त्यांचा डाव?

आणखी एक कटू वास्तव म्हणजे काही ठिकाणी गणपती मंडपाच्या परिसरात पत्त्यांचे डाव रंगतात ज्याच्या नावाने आपण उत्सव साजरा करतो, त्याच गणरायाच्या समोर जुगाराचा डाव मांडणे कितपत योग्य आहे? गणपतीची स्थापना ही सद्बुद्धी मिळावी म्हणून की वाईट सवयींना खतपाणी घालण्यासाठी? हा प्रश्न मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीच नव्हे, तर प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारला पाहिजे.                                                                                                                                                     विसर्जन म्हणजे भक्तीचा शेवट नव्हे

अनंत चतुर्दशीचा दिवस आला की गणरायाला निरोप दिला जातो. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” असा जयघोष होतो.

परंतु काही ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत दारूच्या नशेत धिंगाणा, हुल्लडबाजी, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचे प्रकार घडतात.गणरायाला निरोप देताना आपली संस्कृती, आपले संस्कार आणि आपली जबाबदारीही आपण विसर्जित करणार आहोत का? हा प्रश्न केवळ पोलिसांचा नाही. हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे.

वर्गणीचा पैसा समाजासाठी वापरला तर...

कल्पना करा—एका गणेश मंडळाने एक लाख रुपये वर्गणी जमा केली.

त्यातील मोठा हिस्सा फक्त डीजे, सजावट आणि दिखाव्यावर खर्च करण्याऐवजी एखाद्या गरीब विद्यार्थ्याची वर्षभराची शैक्षणिक फी भरली तर? एखाद्या गरजू कुटुंबाला उपचारासाठी मदत केली तर?

गावात शंभर झाडे लावून त्यांची देखभाल केली तर?रक्तदान शिबिर घेतले तर? गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके दिली तर?

गावातील एखादा सार्वजनिक परिसर स्वच्छ केला तर?हा गणपती बाप्पाला अधिक प्रिय उत्सव नसेल का?

मंडप मोठा करण्यापेक्षा एखाद्या माणसाचे आयुष्य मोठे करण्यासाठी पैसा खर्च झाला, तर गणेशोत्सवाचे सार्थक होईल.

तरुणाईने ठरवले तर उत्सवाचे रूप बदलू शकते

आजची तरुणाई ही समाजाची ताकद आहे. तिच्या हातात मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, ऊर्जा आहे, कल्पकता आहे. हीच ऊर्जा जर सामाजिक कार्यासाठी वापरली तर एका गणेश मंडळातून संपूर्ण गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो.

मंडळाने ठरवावे— डीजेपेक्षा रक्तदान मोठे!दिखाव्यापेक्षा शिक्षण मोठे! दारूपेक्षा संस्कार मोठे!पत्त्यांपेक्षा प्रबोधन मोठे!

हुल्लडबाजीपेक्षा सामाजिक बांधिलकी मोठी! हीच खरी गणेशभक्ती. राजकीय हस्तक्षेप की सामाजिक नेतृत्व?

गणेशोत्सवात राजकीय नेत्यांनी सहभागी होऊ नये असे नाही. लोकप्रतिनिधींनी उत्सवात सहभागी व्हावे, शुभेच्छा द्याव्यात, सामाजिक उपक्रमांना मदत करावी.

पण उत्सव हा राजकीय शक्तिप्रदर्शनाचा मंच बनू नये.

कोणाचा मंडप मोठा, कोणाचा डीजे मोठा, कोणाची मिरवणूक मोठी, कोणाची गर्दी मोठी—या स्पर्धेपेक्षा कोणाचे सामाजिक काम मोठे? याची स्पर्धा झाली तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा गणेशोत्सवाचा खरा अर्थ सापडेल.

गणरायाला काय अपेक्षित आहे?

गणपती म्हणजे बुद्धी, विवेक आणि सद्बुद्धीचे प्रतीक मानले जाते.मग गणरायाची स्थापना करून आपण विवेक हरवणार असू, तर त्या स्थापनेचा अर्थ काय? गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडण्यापेक्षा गणरायाच्या विचारांना आपल्या आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पाला मोठा आवाज नको; मोठे मन हवे.मोठा मंडप नको; मोठे सामाजिक कार्य हवे.दिखावा नको; माणुसकी हवी.

दारूचा नशा नको; समाजसेवेचा नशा हवा. गणेशोत्सव हा आनंदाचा असावा, पण त्याचबरोबर तो संस्कारांचा, सामाजिक बांधिलकीचा आणि प्रबोधनाचा उत्सवही असावा. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला दिशा दिली, त्या उद्देशाची आठवण करून देण्याची हीच खरी वेळ आहे. यंदा गणरायाची स्थापना करताना एक संकल्प करूया—

“गणपती बाप्पाच्या नावाने वर्गणी गोळा करू, पण तिचा उपयोग समाजासाठी करू.

गणपतीसमोर आरती करू, पण बाहेरही माणुसकी जपू.

उत्सव साजरा करू, पण कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.

आणि गणरायाला निरोप देताना एक वाईट सवयही त्याच्यासोबत विसर्जित करू!”

कारण शेवटी प्रश्न गणपती बसवण्याचा नाही...

प्रश्न आहे—गणपती आपल्या मनात किती बसला आहे?

गणपती बाप्पा मोरया!

माणुसकी, सद्बुद्धी आणि सामाजिक भान घेऊन पुढच्या वर्षी लवकर या!

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: