दुष्काळाच्या सावटात शेतकऱ्याचा पोळा — शासनाच्या डोळ्यांत पाणी कधी येणार? संपादकीय
पोळा हा केवळ बैलांचा सण नाही; तो शेतकरी आणि त्याच्या काळ्या मातीशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या मुक्या जीवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र यंदाचा पोळा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा काळजी, डोळ्यांत पाणी आणि मनात अस्वस्थता घेऊन आला आहे. कारण मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. पाण्याअभावी डोळ्यादेखत पिके सुकत आहेत आणि शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत.
एकीकडे खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. पिकांची अवस्था पाहिली जात आहे, पंचनामे होत आहेत, चर्चा होत आहेत. पण प्रश्न असा आहे की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहण्यापलीकडे ठोस निर्णय कधी होणार?
मानोरा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. विहिरींमध्ये थोडेफार पाणी आहे; शेतकरी ते पाणी पिकांना देण्यासाठी धडपडत आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत नसल्याने हाताशी असलेले पाणीही शेतापर्यंत पोहोचवता येत नाही. म्हणजे पाणी असूनही पिके तहानेने मरत आहेत आणि वीज असूनही ती शेतकऱ्याच्या उपयोगाची ठरत नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासनाच्या कागदावर योजना असतील, आदेश असतील, पाहणीचे अहवाल असतील; पण शेतकऱ्याच्या शेतात हिरवे पीक नसेल तर त्या कागदांचा उपयोग काय?
शासनाच्या कागदावर योजना असतील, आदेश असतील, पाहणीचे अहवाल असतील; पण शेतकऱ्याच्या शेतात हिरवे पीक नसेल तर त्या कागदांचा उपयोग काय?
दुष्काळाची तीव्रता शेतकऱ्याच्या बांधावर दिसत असताना मानोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यास प्रशासनाची पावले का थबकतात, हा प्रश्न आता शेतकरी विचारत आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणखी किती पिके सुकणे आवश्यक आहे? आणखी किती शेतकऱ्यांनी आभाळाकडे पाहत बसावे?
शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. परंतु अनेक शेतकरी आजही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. घोषणेचा जल्लोष होतो, परंतु प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्याच्या खात्यात कधी पोहोचणार, हा खरा प्रश्न आहे. कर्जाचा डोंगर, उत्पादनाचा वाढता खर्च, महाग झालेले बियाणे, खते, औषधे, डिझेल आणि मजुरी आणि त्यात पावसाची दडी—या सगळ्यांच्या कात्रीत शेतकरी सापडला आहे. आणि तरीही...
याच संकटाच्या काळात शेतकरी आपल्या दुःखाला क्षणभर बाजूला सारतो. आपल्या बैलाला सजवतो. त्याला साज चढवतो, रंगोटी करतो. घरातील परिस्थिती बिकट असली तरी बैलासाठी गोडधोड करण्याची परंपरा तो जपतो. साखरेपासून सर्वच वस्तू महाग झाल्या असल्या तरी आपल्या ऐपतीप्रमाणे पुरण तयार करतो. गोड नैवेद्य दाखवतो. बैलाला हनुमान मंदिराच्या पारावर घेऊन जातो आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून मनोमन म्हणतो—“तू माझ्यासाठी वर्षभर राबलास, तुझ्यामुळे माझ्या संसाराची चूल पेटली; तुझ्याप्रती माझी कृतज्ञता कायम आहे.”
हीच तर शेतकऱ्याची श्रीमंती आहे!
खिशात पैसा नसला तरी मन मोठे आहे. घरात संकट असले तरी परंपरा जपण्याची ताकद आहे. स्वतःच्या पिकाला पाणी मिळत नसले तरी आपल्या बैलाच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत, एवढी संवेदना त्याच्या मनात आहे.
पण शासनाने या शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू कधी पाहणार?
पोळ्याच्या दिवशी बैल सजलेला दिसतो; मात्र त्याच्या मालकाच्या चेहऱ्यावरची चिंता दिसत नाही का? बैलाच्या अंगावरची रंगोटी प्रशासनाला दिसते, पण शेताच्या बांधावर करपलेले पीक दिसत नाही का? मंदिराच्या पारावरचा नैवेद्य दिसतो, पण शेतकऱ्याच्या घरातील रिकामा धान्याचा डबा दिसत नाही का?
लोकप्रतिनिधी आणि अधिकारी बांधावर जाऊन पाहणी करतात, हे चांगलेच. मात्र पाहणीचे फोटो आणि प्रत्यक्ष मदत यातील अंतर आता कमी झाले पाहिजे. शेतकऱ्याला आश्वासन नव्हे, तर तातडीची मदत हवी आहे.
मानोरा तालुक्यातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीबाबत ठोस निर्णय घ्यावा. वीजपुरवठा सुरळीत करावा. उपलब्ध पाण्याचा वापर करून पिके वाचविण्यासाठी कृषीपंपांना आवश्यक वीज द्यावी. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.
कारण शेतकरी सण साजरा करतोय म्हणून त्याचे दुःख संपलेले नाही.
तो पोळा साजरा करतोय, कारण त्याला आपल्या बैलावर प्रेम आहे. तो पुरणाचा नैवेद्य करतोय, कारण त्याला आपली परंपरा प्रिय आहे. तो हसण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू द्यायची नाही.
पण शासनाने हे लक्षात ठेवावे—
शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा गैरसमज करून घेऊ नका.
त्याच्या शांततेला समाधान समजू नका.
आणि त्याच्या सणाला त्याच्या संकटावर पडलेले रंगीत आवरण समजू नका.
आज पोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे. आता शासनानेही शेतकऱ्याप्रती आपली कृतज्ञता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे.
बैलाला साज चढविणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्याला आधार देणे, हीच खरी शासनाची जबाबदारी आहे.
अन्यथा यंदाचा पोळा शेतकऱ्याच्या घरातील सण न राहता, व्यवस्थेच्या अपयशाचा मूक साक्षीदार ठरेल.
— संपादकीय
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
शेतकऱ्यांचा आक्रोश आता निवेदनापुरता राहू नये!
16 Sep 2026
पोहरादेवीत आठ जण उपोषणावर; मागणीवर व्यापक संवादाची गरज चौथा दिवस... प्रश्न अधिक स्पष्ट होण्याची वेळ
16 Sep 2026
गणपती बाप्पा मोरया... पण उत्सवाचा अर्थ तरी समजून घ्या! संपादकीय
15 Sep 2026
स्वातंत्र्यदिन विशेष : तिरंगा फडकतोय... पण आपण खरोखर स्वतंत्र आहोत का? — नागरिकांनी एकदा थांबून स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे!
14 Aug 2026